Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

म्हणून सचिन महान आहे !ऑस्ट्रेलियन बॅट्समन मॅथ्यू हेडन एकदा म्हणाला होता, " I have seen God, he bats at no.4 for India"
स्वत:च्याच संघातल्या खेळाडूंना नाही तर प्रतिस्पर्धी आणि कट्टर विरोधक असलेल्या संघातल्या खेळाडूंनाही सचिनविषयी एवढा आदर कसा काय वाटू शकतो ?
म्हटलं तर सचिनचा करिश्माही असा की, तो संघात असल्यावर बाकी कुणाचाही परफॉर्मन्स फिकाच वाटावा.
मात्र तसं आपल्या सहकार्यांना वाटू न देणं, त्यांनी आपल्याशी दोस्ती करणं, आपल्याला त्यांच्यातलंच
एक मानणं यासाठी सचिननं त्याच्या बाजूनंही प्रयत्न केले असावेत.
१९९३ ची गोष्ट. इडन गार्डनवर हिरो कपची सेमिफायनल होती. साऊथ आफ्रिकेसारखा तगडा संघ समोर होता.
शेवटची ओव्हर. ती कुणी टाकायची असा प्रश्न होता. आफ्रिकेला जिंकण्यासाठी फक्त ६ रन्स हवे होते.
मॅकमिलन हा सेट बॅट्समन सहज ते करेल यात काही शंका नव्हती. कॅप्टन अझरला वाटत होतं की, कपिलनं
ती ओव्हर टाकावी. पण कपिल देवनं स्पष्ट नकार दिला, असं बोललं जातं. सचिन मात्र स्वत:हून अझरकडे
गेला आणि म्हणाला, ‘मला दे मी टाकतो ही ओव्हर, डोण्ट वरी’.
ती मॅच हातची गेली तर काय होईल, लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार न करता सचिननं टीमसाठी स्वत: हातात चेंडू घेतला आणि अत्यंत प्रेशरखाली भन्नाट ओव्हर टाकली. आणि भारत तो सामना जिंकला.
संघ आधी, आपण नंतर हे तत्त्व त्यानं नेहमी जपलं.
जेव्हा जेव्हा तो स्वत:साठी खेळतो अशी टीका झाली तेव्हा तो गप्प बसला. फक्त एकदाच म्हणाला, ‘क्रिकेट
हा सांघिक खेळ आहे असं आपण मानतो ना, मग चांगल्या- वाईट खेळासाठी एका माणसाला जबाबदार धरू नये. चांगलं झालं तेही संघाचंच कर्तृत्व असं मी तरी मानतो.’
Loading...
आणि संघाच्या त्या यशात सचिनचा वाटा नेहमीच असतो, असं सगळे सहकारी सांगतात. अनिल कुंबळेनं स्वत: सांगितलेला हा किस्सा. त्यानं पाकिस्तानविरोधी कसोटी सामन्यात १0 विकेट्स घेतल्या.
तो दिवस त्याचाच होता. पण हळूहळू टेन्शन वाढायला लागलं होतं. सचिन मात्र सतत त्याच्याशी बोलत
होता. शांत रहा म्हणून धीर देत होता. त्याचवेळी एक गोष्ट घडत होती. प्रत्येक ओव्हर टाकायला जाताना कुंबळे
आपली टोपी आणि स्वेटर काढून सचिनच्या हातात द्यायचा. सचिन ती अंपायरकडे द्यायचा. कुंबळेला वाटलं
असं केलं की, त्या ओव्हरला विकेट नक्की पडते. मग त्यानं प्रत्येक ओव्हर टाकताना तसंच केलं.
आणि म्हणता म्हणता १0 विकेट कुंबळेनं घेतल्या. अर्थात ‘व्हाया सचिन’ काहीतरी केलं म्हणून कुंबळेला १0 विकेट घेता आल्या असं अजिबात नाही, पण कुंबळे म्हणतो तसं, ‘सचिन सोबत आहे. तो सपोर्ट करतोय. जमेल म्हणतोय या भावनेनंच हिंमत वाढली.’
एवढं जुनं कशाला, नुकतं रोहित शर्मानं कसोटी पदार्पणातच शानदार शतक झळकावलं.
किती दिवसांनी कसोटीची संधी त्याच्या वाट्याला आली. तो काहीसा बावरला होता, थोडा अस्वस्थ होता. सचिननं आपली टोपी त्याला दिली, त्यानं ती डोक्यात घातली आणि हिमतीनं मैदानात उतरला.
बाकी, त्यानं जे घडवलं ते इतिहास आहे.
इतकं चांगलं टीमप्लेअर बनणं त्याला कसं जमलं? अँटिट्यूड?
सचिन तेंडुलकरचं व्यक्तिमत्त्वही थोडं विरोधाभासीच आहे.  एकीकडे त्याला काही ‘अँटिट्यूड’च नाही. कसलाच शिष्टपणा नाही, मी थोर्थोर असं लेबल लावून तो फिरत नाही.
आणि दुसरीकडे, त्याच्याकडे एक वेगळाच अँटिट्यूड आहे. कधी बोलावं, कधी बोलू नये, काय बोलावं, कुठे बोलावं, कशाविषयी बोलावं हे त्याला नेमकं कळतं. आणि तोच त्याचा अँटिट्यूड त्याची एक अत्यंत वेगळी ‘हंबल’ इमेज निर्माण करतो.
इमेज मेकिंग आणि मार्केटिंगच्या या काळात हे सूत्र लक्षात ठेवण्यासारखं आहे.
बी अ टीमप्लेअर समजा, तुमची गुणवत्ता इतरांपेक्षा जास्त आहे, तुमचं कौतुकही जास्त होतं, तुमचा परफॉर्मन्सही जबरदस्त आहे. पण म्हणून इतरांना कमी लेखलं तर संघसहकारी ते कसं सहन करतील. आणि क्रिकेट हा तर सांघिक खेळ आहे. एक रन काढताना पण आपला सहकारी आपल्याबरोबर धावला तरच तो निघतो, नाहीतर विकेट जाते, रन्स होत नाहीत.
हे गणित त्यानं कायम लक्षात ठेवलं असावं. तो कायम संघाचाच होता. संघाबरोबर राहिला. संघातल्या ज्युनिअर खेळाडूंनी मार्गदर्शन मागितलं तर ते त्यानं केलं. मुख्य म्हणजे मागितल्यावर केलं, काय तुम्हाला एवढं येत नाही, असा कधीही त्याचा आविर्भाव नव्हता.  वर्क हार्ड, एव्हरी डे सचिन तेंडुलकर ९९ शतकांवर अडकला होता, ते आठवतंय. त्याचं १00 वं शतक काही केल्या होत नव्हतं. मॅच मागून मॅच जात होत्या पण शतक होतच नव्हतं. धावा आटत होत्या. त्याचे कट्टर फॅन्सही त्याच्या नावानं खडे फोडायला लागले होते.
- याचा काय अर्थ?
लोकांना काही देणं-घेणं नसतं, तुम्ही काल काय परफॉर्म केलं, किती जीवतोड उदात्त कामगिरी केली?
त्यांना तुम्ही आज काय करताय याचं उत्तर हवं असतं. सचिन यशाच्या शिखरावर होता तेव्हाच त्याला हे वास्तव कुणाहीपेक्षा जास्त कळलेलं असावं. त्यामुळे तो नेहमी म्हणतो, ‘वर्क हार्ड अँण्ड हार्डर एव्हरीडे.
रोजचा दिवस, रोजची मॅच नवीन असते. समोर येणारा प्रत्येक चेंडू नवा असतो. वन चेंडू अँट अ टाईम, हे
माझं साधं सूत्र.’
एकावेळी एक चेंडू, हे सूत्र कुणाच्याही करिअरमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरावं.
स्पर्धा स्वत:शी टीम म्हटली की प्लॅनिंग आलं, त्याची अंमलबजावणीही आली. इनोव्हेटिव्ह
आयडियाही आल्याच. आयडिया माझी आणि भाव खाऊन भलताच जातो असं म्हणत अनेक जण टीममध्ये
आपल्या सहकार्यांशीच स्पर्धा करायला लागतात. खुन्नस घेतात.
सचिनच्या बाबतीत असं कधीच का कानावर येऊ नये? त्याच्याबरोबर द्रविड-गांगुली-कुंबळे-श्रीनाथ असे एकसे
एक गुणी खेळाडू खेळत होते. पण त्यानं दुसर्या कुणावर कधी स्कोअर केला नाही, उलट त्यांच्यात दोस्तीच कायम होती.
सचिन म्हणतो, माझा तुलना आणि तुलनात्मक स्पर्धा यावर विश्वासच नाही. मी इतरांशी कधी तुलना करत नाही, मी फक्त माझा खेळ खेळतो. मला एवढंच कळतं की, यू वॉण्ट टू बी ऑन टॉप ऑफ युवर गेम ऑल द टाईम अँण्ड पुश युवरसेल्फ हार्डर अँण्ड हार्डर.’
- स्वत:शीच अशी स्पर्धा सोपी कशी असेल?