दिवाळीतील सणांचं महत्व - Importance Of Diwali Festivals
दिवाळी म्हटलं की, सगळीकडे उत्साहाचं वातावरण पहायला मिळतं. आवराआवर, रंगरंगोटी नुसती धामधूम सुरु असते. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूंची खरेदी तर मोठी पर्वणीच असते. फटाक्यांची आतिषबाजी अन् चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य. दिवाळीचं दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिवाळीची सुरुवात वसुबारसेपासून होते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. चला तर आज दिवाळी आणि त्यातील सणाचं महत्व जाणून घेऊयात...
१६ ऑक्टोबर : वसुबारस
दिवाळीच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे वसुबारस. वसुबारस याचा अर्थ - वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात.
घरात लक्ष्मीचे आगमन, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळवे व सुख लाभावे म्हणून हि पूजा करतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
१७ ऑक्टोबर : धनत्रयोदशी
या दिवशी लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. वैद्य लोक या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवसापासून घरांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे.
लक्ष्मीची / धनाची पूजा मुहूर्त : संध्या. 6:10 ते 8:39 वाजता.
१८ ऑक्टोबर : नरक चतुर्दशी
कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. आपण या दिवशी आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवसिक तेल, सुगंधी साबण वापरतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरिता पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.
अभ्यंगस्नान मुहूर्त : स. 5:06 ते 06:36 वाजता.
१९ ऑक्टोबर : लक्ष्मीपूजन
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मी पूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदुळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
लक्ष्मी पुजेसाठीचा मुहूर्त : संध्या. 06.08 ते 08.38 वाजता.
२० ऑक्टोबर : पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे.
आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.
पाडव्याचा मुहूर्त : स. 06.37 ते 08.55 / संध्या. 03.49 ते 06.08 वाजता.
२१ ऑक्टोबर : भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता हा भाऊबीजेच्या सण आहे. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
या दिवशी भावाने बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्यावयाचे असते व बहिणीने स्वत:च्या हाताने केलेला स्वयंपाक भावाला खाऊ घालायचा असतो. त्यामुळे भावाचे आयुष्य वाढते असे मानले जाते.
भाऊबीज मुहूर्त : दु. 01.31 ते 03.49 वाजता.