Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कथा पहिले भारतीय विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादवांची !


 
 
 
१९०३ साली अमेरिकेत राईट बंधूंनी पहिले विमान उडवले. त्याआधीच १८९५ मध्ये महाराष्ट्रात शिवकर बापूजी तळपदे यांनी पहिले विमान बनवले आणि उडवले असा दावा केला जातो. या तथाकथित पहिल्या विमानाच्या कथेवर ‘हवाईजादा’ हा हिंदी चित्रपटही येऊन गेलेला आहे. ती सारी कथा सत्य असली/नसली तरीही, त्याच महाराष्ट्राच्या मातीत संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले विमान उडवणारा आणि विमान बनविण्याची पहिली भारतीय खाजगी कंपनी काढणारा हवाईजादा म्हणजे कॅप्टन अमोल यादव.
अमेरिकेतुन प्रशिक्षण घेऊन वैमानिक झालेल्या अमोल यादवांना '१९४४ सालीच अमेरिका जर दरदिवशी २६३ विमाने बनवत होती', तर भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकही विमान कसे काय बनविल्या गेले नाही हा प्रश्न छळत असे. त्यानुसार त्यांनी विमाननिर्मितीचा चंग तर बांधला; पण वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी पाहिलेल्या या स्वप्नापासून ते साकार करण्यापर्यंतचा रस्ता अनंत आव्हानांनी भरलेला होता. परंतु वडिलांकडून आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले कॅप्टन अमोल खचले नाहीत. विमानासाठी लागणारे शक्तिशाली इंजिन खरेदी करण्यासाठी तर त्यांच्या आईंनी अक्षरशः आपले मंगळसूत्र गहाण ठेवले !
अपरिमित कष्ट घेऊन, छोट्यामोठ्या कित्येक अडचणींचा मोठ्या चिवटपणे सामना करत २०११ साली आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर अमोल यादवांनी सहा आसनी विमान बनविले. हे विमान रजिस्टर करण्यासाठी त्यांनी नागरी उड्डयण महासंचलनालय (DGCA) येथे रितसर अर्जही केला, सात वर्षांत तिथे इतक्या खेपा घातल्या की त्यांच्या खिशातले सगळे पैसेही संपून गेले ; परंतु दर वेळी त्यांना DGCA कडून टोलवाटोलवीची उत्तरेच मिळाली.
यावर कहर म्हणजे पहिल्या भारतीय बनावटीचे विमान रजिस्टरच होऊ नये म्हणून DGCA च्या सरकारी बाबूंनी अक्षरशः २५ जुलै २०१४ साली त्यासंबंधी नियमच वगळून टाकले, ज्यामुळे भारतात बनविल्या गेलेले कोणतेही विमान कधीही रजिस्टर होऊ शकणार नव्हते. या लाल फितीच्या भोंगळ कारभारात भारतीय उद्योगाची एक नवी भरारी अडकून राहिली होती..
पण २०१६ साली ‘मेक इन इंडिया’ मध्ये मुख्यमंत्रीे श्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅप्टन अमोल यादवांचे हे विमान पाहिले, आणि त्यानंतर स्वतः यात जातीने लक्ष घालून कॅप्टन अमोल यादवांच्या “थ्रस्ट एयरक्राफ्ट” या सहा आणि एकोणीस आसनी विमाने बनविण्याऱ्या कंपनीसाठी पालघर मध्ये १५७ एकर जागा मंजूर करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ केला. आणि DGCA चे प्रमाणपत्र प्राप्त करवून देण्यासाठी आपण केंद्र सरकारशी संपर्क साधू असे आश्वासनही दिले. त्याप्रमाणे श्री देवेंद्र फडणवीसांनी २१ एप्रिल २०१७ रोजी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पहिले पत्र लिहिले. त्यांची स्वतः भेट घेऊन चर्चाही केली.
तरीही भारतात विमाननिर्मिती करण्यासंबंधीचा नियमच वगळून टाकणाऱ्या DGCA नी अमोल यादवांच्या कंपनीच्या प्रमाणिकरणाबाबत कोणतीही पाऊले उचलली नाहीत. या सर्व गोष्टींमुळे कॅप्टन अमोल यादव काही वेळा हताश झाले, त्यांच्या १९ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तयार झालेले हे विमान लाल फितीच्या भोंगळ कारभारात अडकून पडले होते. अगदी एका महिन्याभरापूर्वी त्यांनी हे विमान अमेरिकेत रजिस्टर करण्याचा विचारही केला होता..
मात्र तरीही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागे पहाड बनून उभे होते. यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री मोदींना अजून एक पत्र लिहिले आणि आणखी तीन वेळा भेटून त्यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र आणि नरेंद्र यांच्या या साऱ्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून शेवटी पंतप्रधान कार्यालयाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर DGCA नी विमाननिर्मितीसंबंधीचा जुना नियम परत आणला व त्यामुळेच आता कॅप्टन अमोल यादव यांची “थ्रस्ट एअरक्राफ्ट इंडिया” ही पहिली भारतीय खाजगी विमाननिर्माती कंपनी ठरेल !
श्री देवेंद्र फडणवीस व श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कॅप्टन अमोल यादवांनी आपल्या पहिल्या विमानाला - *VT NMD* असे नाव दिले आहे ! NMD म्हणजे "Narendra Modi Devendra" !! पहिल्या भारतीय विमानाचे अशा प्रकारे राजकीय व्यक्तींच्या नावाने नामकरण करणे योग्य वाटते का असे विचारल्यावर ते म्हणतात, "DGCA नी वगळलेल्या नियमामुळे देशाचे जे तीव्र नुकसान होत होते; ते CM आणि PM यांच्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे आता थांबलेय. आणि त्यामुळे त्यांचे नाव माझ्या पहिल्या विमानाला देण्यात मला काहीच गैर वाटत नाही!"
एका उत्कृष्ट प्रयत्नामागे जर प्रबळ राजकीय इच्छाशक्ती उभी राहिली तर काय होऊ शकते याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण थ्रस्ट एयरक्राफ्ट ही पहिली भारतीय खाजगी विमाननिर्माती कंपनी ठरेल. आणि या कंपनीसोबतच एका मराठी वैमानिकाच्या जिद्दीची आणि एका मराठी मुख्यमंत्र्याच्या सहकार्याची ही कथा भारतीय इतिहासात अजरामर होऊन जाईल !

(कु. वैष्णवी सतीश सोनारीकर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांच्या पेज वरून साभार  !