Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

गाडीच्या चाव्या विसरून आपरेशन थियेटर मधे पळनारा डॉक्टर.....

 

  गाडीच्या चाव्या विसरून आपरेशन थियेटर मधे पळनारा डॉक्टर.....होय मानुसकी जीवंत आहे. ब्रेन डेड पुण्याच्या कोलंबिया एशिया हॉस्पिटलला न्युरोसर्जरी कन्सल्टंट म्हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटल मधून न्युरोसर्जरीचीपदवी संपादन करुन, तिथे केलेल्या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचाप्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्याला आलो होतो.शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्या इमर्जन्सी रुम मधून फोन होता. डॉक्टर बोलत होते."सर, एका २० वर्षाच्या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्लीप होऊन तो रस्त्यावर पडला होता. डोक्याला मार लागला आहे. सुरूवातीला त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्येनेले होते. पण त्यांना तिथे कळले की, तो जवळजवळ 'ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही.

त्यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत."‘ब्रेन डेड’ म्हणजे ज्या पेशंटचा श्वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्त हृदय चालू आहे असा पेशंट! मी डॉक्टरना विचारले की, "आता काय स्टेटस आहे? " त्यांनी सांगितले की, "सर त्याचा श्वास बंद पडलेला होता म्हणून आम्हीकृत्रिम श्वासाची नळी बसवली व व्हेंटिलेटरने श्वास देतोय. त्याचे दोन्ही प्युपिल्स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत." सहसा नॉर्मल माणसामध्ये डोळ्यांच्या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्ये ती रिअॅक्शन दिसत नाही.) "सर, मी ब्रेन चा सी.टी. स्कॅन करून वॉट्सअॅपवर पाठवला आहे."मी स्कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्या मेंदूमध्ये उजव्या बाजूला मोठा रक्तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्या बाजूला सरकला होता. स्कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्यांना सूचना दिल्या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्याससांगितले गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो. तोच पप्पा म्हणाले "मी येतो सोडायला, तुम्ही केसच्या नादात गाडी फास्ट चालवाल!" सगळेचजणं जेवणावरून उठले. पण मी त्यांना सांगितलं, "काळजी करू नका.

मी गाडी सावकाश चालवतो." मला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्पिटलमध्येपोहोचलो. गाडी मी इमर्जन्सी रूमच्या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्पिटलमध्येघूसलो. सिक्युरिटी गार्डनी सांगितले, "सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्ये शिफ्ट केलाय." लिफ्टसाठी न थांबताच जीना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्ये पोहोचलो. पेशंटलाबघितलं तर त्याची दोन्ही बुबुळं प्रसरण पावलेल्या अवस्थेत होती. श्वास पूर्णपणे बंद पडलेला होता आणि व्हेंटिलेटर द्वारा श्वास देण्यात येत होता.नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते.मी त्यांना म्हणालो," पेशंटवाचण्याचे चान्सेस ५% पेक्षा कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्याची एक संधी द्यायला हवी.थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही.तुम्ही ठरवा ! "नातेवाईक चांगलेच हडबडले होते.त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तीन तासांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं!ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते पण त्यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्य नव्हतं.

मी जोरात ओरडलो,"पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या." आजूबाजूला १०-१५ स्टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्ये शिफ्ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता.जनरली ऑपरेशन करण्याआधी इन्फेक्शन कंट्रोल म्हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्हलॉन ने १० मिनिटं स्वच्छ धुतलं जातं, तसेच ऑपरेशन करणारे डॉक्टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते पण ती १७ मिनिटे सध्या मी देऊशकत नव्हतो कारण मेंदूमध्ये प्रेशर खूपच वाढत होते आणि अशा अवस्थेत एका सेकंदाला हजारो न्यरॉन्सची(मेंदूच्या पेशी) डेथ होते(मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार )होत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्टरना सांगितले,"ऑपरेशनच्या साहित्याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्य मी घेतो." ऑपरेशन थिएटर मधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते, जणू काही प्रत्येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्न होता भूलतज्ञांचा. त्यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती. आणि ते आल्यावरही पूर्ण भूल देण्यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता, त्यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटर मध्ये घेतला जात नाही, परंतु इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला.

मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्त गोठून रक्ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्या रिस्पॉन्सची वाट बघू लागलो.पुढच्या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वास्थितीत आला आणि मेंदूचे पल्सेशन हालचाल) दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्हणजेच मला फोन आल्या पासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्याच्या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्स होण्यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले.ऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतु अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्याची जाणीव होत होती. आज माझा सिक्स्थ सेन्स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्हणून मी लगेचच सीटी स्कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्ट सी.टी.स्कॅन युनिटमध्ये शिफ्ट करण्यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्या मेंदूच्या दुसर्या बाजूला (डाव्या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्या स्कॅनमध्ये हा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नव्हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले, त्यामध्ये कोणतीही रिअॅक्शन दिसत नव्हती.आता मला प्रश्न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्य आहे का? पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.ते म्हणाले, " सर, आम्ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो ,

परंतू तुमची धडपड पाहून आम्हाला वाटते की आपणास जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या. त्याला आमची सहमती आहे."मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्त पाण्यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्य होईना. भूलतज्ञानी दुसर्या बाजूने त्याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्त चढवत होते. मी कवटी उघडून शक्य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली, पण मला माहित होते की, रक्त गोठण्याची प्रक्रिया बंद पडल्याने तेथे रक्तस्त्राव होत राहणार.म्हणून मी एक युक्ती केली.जिथे रक्तस्त्राव होत होतातिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्याऐवजी, रक्त बाहेर पिशवीमध्ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्ये शिफ्ट केले. परंतु पेशंटच्या बुबुळांमध्ये अजूनही कोणतीही रिअॅक्शन आली नव्हती.आता मात्र मन अत्यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्टर रूममध्ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्युरिटी गार्ड पळत आला आणि म्हणाला, " सर, तुम्ही तुमची गाडी कॅज्युअल्टिच्या दारामध्ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्या बाजूस पार्किंगमध्ये पार्क केली आहे. ही चावी घ्या." मी त्याला धन्यवाद दिले व डॉक्टर रुममध्ये जाऊन बसलो.आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्वराला शरण जाण्याची! मी परमेश्वराचे नामस्मरण करू लागलो. या सर्व प्रयत्नांना यश येण्यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले.तोच काय तो आधार होता! साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्सिव्हीस्ट पळत आले आणि म्हणाले," सर, लवकर चला.

पेशंटला बघा चला." मी लगेचच जावून पाहिलं तर काय चमत्कार ! त्याच्या दोन्ही बुबुळांमध्ये आता रिअॅक्शन दिसत होती.माझ्याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.त्यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्हता. त्यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्या रक्त/पांढर्या पेशी दिल्या गेल्या. पुढचे ४८ तास माझ्यासाठी खूपचअवघड होते. त्या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्यावरती होती. "मी प्रयत्न करतो!" या एका शब्दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्याची शक्यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्या. ते म्हणायचे डॉक्टर, पहिल्या स्कॅनमध्ये दुसर्या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले? आणि पहिले ऑपरेशन झाल्यानंतर दुसर्या बाजूस एवढी मोठी रक्ताची गाठ कशी काय तयार झाली? मग मी त्यांना सांगितले की, पेशंट ज्या वेळी पडला त्यावेळी त्याला डोक्याच्या दोन्ही बाजूला मार लागला असावा त्यामुळे दोन्ही बाजूला रक्तस्त्राव सुरू झाला पण उजव्या बाजूला मोठी रक्तवाहीनी फुटल्यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्या बाजूने प्रेशर आल्याने मेंदू डाव्या बाजूस सरकला गेला आणि डाव्या बाजूचा रक्तस्त्राव तात्पुरताबंद झाला. पण जसे मी उजव्या बाजूची रक्ताची गाठ काढुन घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्थितीत आला. त्यामुळे डाव्या बाजूने थांबलेला रक्तस्त्राव पुन्हा सुरू झाला. त्यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्ताची गाठ काढणे आवश्यक वाटले. अशा तर्हेने त्यांच्या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते.पुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो माझी तगमग बघून माझ्या पप्पांनी व माँसाहेबांनी ही देवाला साकडे घातले.

सर्व घरच परमेश्वर चरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्या परीक्षेचा दिवस उजाडला पेशंटला स्कॅन करण्यासाठी शिफ्ट केले आणि काय आश्चर्य ! मी केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगीपडली होती. पेशंटचा स्कॅन एकदम छान होता. दोन्ही बाजूंचा रक्तस्त्राव पूर्णपणे निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्ये शिफ्ट केले व त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्यास व डोळे उघडण्यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या ३/४ तासात त्याचा श्वासही चांगला चालू लागला त्यामुळे मी व्हेंटिलेटरही काढून घेतला.आता त्याच्या आई-वडीलांना आय.सी.यू. मध्ये बोलाऊन घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल? त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य! तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरच सुखद धक्का बसला.

मी त्याला विचारले हे कोण आहेत? तू ओळखतोस का यांना? तर तो म्हणाला, " यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड." आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यांतील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या. वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. "ही इज अ बॉर्न फायटर!तुमचा मुलगा सुखरूप परत आला!"आणि आम्ही लढाई जिंकली होती! एकजवळजवळ ब्रेन डेड होणारा पेशंट जागा होऊन आमच्याशी बोलत होता. विशेष म्हणजे त्याला कोणतेही व्यंग (न्यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्हते. त्यांच्या नातेवाईकांच्याआनंदाला पारावार राहिला नव्हता. डोळ्यातून वाहणार्या पाण्याला सीमाराहिली नव्हतीहॉस्पिटलमध्येआनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिश्चार्ज होऊन घरी जाताना त्याने मला आश्वासन दिले की,इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.खरच ! आयुष्यामध्ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्हाला त्या दैवी शक्तीचे सामर्थ्य आणि अस्तित्व मान्य करण्यासाठीभाग पाडतात !

साभार : डॉ. प्रवीण सुरवशे.कन्सल्टंट न्युरोसर्जन कोलंबिया एशिया हॉस्पिटल पुणे फोन ः ७७३८१२००६०