Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

का करावी नर्मदा परिक्रमा ? हि पापे जातात धुतली !

नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते . ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे . परिक्रमेतील आत्मिक व दैवीय अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५ दिवस, २१ दिवसांत पूर्ण करतात.
या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या - मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य - जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० कि.मी. आहे . सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. असे सांगितले जाते कि प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषीनीं अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात कि श्री मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती कि त्यांनी श्री नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनद्या, ओढ़े, नाले देखील त्यांच्या प्रवाहातून पार न करता त्यांच्या उगम अथवा विलया पर्यंत जाऊन तेथून ते पार केले होते.
नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहे. या परीक्रमे नंतर प्रत्येक परिक्रमावासी चे आयुष्य बदलल्या शिवाय रहात नाही. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परीक्रमेचे एकूण अंतर ३,५०० किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्या नुसार नर्मदा परिक्रमेचा अवधी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाचा आहे , तसेच हि परिक्रमा 108 दिवसांत देखील पूर्ण करतात. बरेचसे परिक्रमावासी आपआपल्या शक्ती नुसार शक्य तेवढ्या दिवसांत परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसांत पूर्ण केली या पेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास परीक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात. नर्मदा मैया मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.
नर्मदा परिक्रमा या विषयी माहिती मिळवण्यासाठी मराठी तसेच इतर भाषेत देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. 
मराठी मध्ये ‘श्री जगन्नाथ कुंटेजी’ यांचे ‘नर्मदे हर हर ’ हे पुस्तक खुपच प्रसिद्ध आहे. तसेच ‘भारती ठाकुरजी’ यांचे ‘नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा’ हे पुस्तक देखिल खुप माहितीपूर्ण आहे. ‘दा.वि.जोगळेकर’ यांचे ‘नर्मदा परीकम्मा’ हे पुस्तक देखील छान आहे. अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. नर्मदे हर...!!!